अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | “तू आवडतेस, रात्री तू माझ्याशी बोल, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन, अशी बतावणी करून वारंवार विनयभंग व अत्याचार करीत जर कोणास सांगितले तर तुझी मी बदनामी करेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम मारुती काळेल (रा. जांभुळणी, ता. माण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याच्याविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नोव्हेंबर २०२३ मध्ये एका रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, त्यानंतर दि. ३१ मार्च २०२४ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान विक्रम काळेल याने पीडित मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग करून तसेच मोबाईलवरून वारंवार संपर्क साधून, धमकावत तिच्यावर अत्याचार केला. तसेच जर हा प्रकार कोणास सांगितला तर “तुझी वारंवार बदनामी करून तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देऊन त्याने त्याच्याकडील वाहनातून नेऊन वारंवार तिच्यावर जबरदस्तीने इच्छेविरुद्ध संबंध प्रस्थापित केले. त्यात ती गर्भवतीही राहिली.

त्यानंतर तिला गोळ्या आणून खाण्यासाठी दिल्या; परंतु तिच्या पोटात दुखून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिल्यामुळे अत्याचार पीडित मुलीने म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक करीत आहेत.