AC रूममध्ये राहिला अन् बिल न देता पळाला; जकातवाडीतील एकावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | हाॅटेलमध्ये राहून बिलाची रक्कम आॅनलाईन पाठविल्याचे भासवून ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांबरवाडी येथील एका हाॅटेलात घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जकातवाडीच्या एकावर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी चंद्रसेन धनंजय जाधव (रा. पोवईनाका सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार पंकज गणपत बाबर (रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. दि. १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे.

संशियत पंकज बाबर याने सांबरवाडी, ता. सातारा येथील एका हाॅटेलमधील एसी खोली बुक केली होती. त्यावेळी त्याने खोली, जेवण आणि मद्याच्या बिलासाठी ३५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम हाॅटेलच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याचे सांगितले. तसेच पैसे गेल्याचा मेसेजही दाखविण्यात आला. त्यामुळे यावर विश्वास ठेवून त्याला हाॅटेलात खोली दिली. तसेच राहिलेल्या कालावधीत आॅर्डरप्रमाणे जेवण आणि मद्य पुरविण्यात आले.

मात्र, दि. १८ फेब्रुवारीला पहाटे तो कोणासह न सांगता आणि सुमारे ३२ हजार रुपयांचे बील न देता निघून गेला. तसेच आॅनलाईनचे पैसे हाॅटेलच्या खात्यावरही जमा झाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समोर आले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हवालदार चव्हाण हे तपास करीत आहेत.