सातारा प्रतिनिधी । सध्याच्या घडीला प्रत्येकाला आर्थिक पैशाची चणचण हि भासत आहे. तर काहीजण आपल्याला कुठूनतरी बक्कळ पैसे मिळावेत त्यासाठी एखादा शॉर्टकटचा मार्ग सापडावा, अशी स्वप्ने पाहत आहेत. मात्र, तो मार्ग पकडला कि त्याचे धोके देखील पहायला मिळत आहेत. अशीच एक आर्थिक फसवणुकीची घटना सातारा येथे घडली आहे. विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवून तब्बल ३१ लाख ६६ हजारांची दोघांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानासाहेब बबन भोसले, सचिन प्रल्हाद पंडित, शीतल सचिन पंडित, जीवन प्रकाश शिर्के अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदार शरद वाघ (वय ४६, रा. कृष्णकुंज, वृदांवन स्वामी विवेकानंदनगर, फलटण) यांना वरील संशयितांनी विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत पैसे गुंतविल्यास जादा परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यामुळे वाघ यांनी वेळोवेळी १२ लाख दिले. त्याबदल्यात परतावा म्हणून ८१ हजार रुपये त्यांनी दिले.
मात्र, उर्वरित ११ लाख १९ हजारांची रक्कम मागितली असता फोन बंद करून उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली. तसेच पोपट चरणदास शिंदे यांचीही फसवणूक झाली असून, या दोघांची मिळून एकूण ३१ लाख ६६ हजार रुपयांची संशयितांनी फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार २०२२ ते २०२३ या कालावधीत घडला आहे. सहायक पोलिस निरीक्षक काकंडकी हे अधिक तपास करीत आहेत.