कराडातील ‘मोकाशी प्रतिष्ठान’च्या अभिजितसह विश्वजित मोकाशींवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मुंबई येथील चुनाभट्टीमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सरचिटणीस अभिजित मोकाशी आणि उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात वडाळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सध्या वडाळा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील चुनाभट्टी येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात दि. २६ ॲागस्ट रोजी विश्वजित मोकाशी, अभिजित मोकाशी, शेखर पाटील, हनुमंत फाळके आणि अशोक मांढरे यांच्यासह ४० ते ५० जणांच्या गटाकडून हल्ला करण्यात आला. जमावापैकी काहीजणांकडून महाविद्यालयात उपस्थित असणाऱ्या प्रा.रणजित मोरे यांना मारहाण करण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या रिसेप्शनमधून चाव्या हिसकावून घेण्यात आल्या.

ट्रस्टी ऑफिसचे कुलूप तोडून जमावाने आतमध्ये घुसून महाविद्यालयातील सीसीटीव्ही, डीव्हिआरची तोडफोड केली. त्याच दरम्यान १०० क्रमांकावर ही माहिती पोलिसांना देण्यात आल्याने पोलिस तात्काळ महाविद्यालयात दाखल झाले. यासंदर्भात वडाळा पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंडसंहिता कलम ४१८, १४१, १४३, १४७, १४९, ५९४, ५०६, ३२३, ४२७ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ४५२ हे कलम घुसखोरी करून ताबा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासाठी लावले जाते. हा अजामीनपात्र असताना गुन्हेगारांना अद्याप अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल फिर्यादीत प्रा. रणजित मोरे यांनी उपस्थित केला आहे.