सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तरुणींच्या विनयभंगच्या घटना अधून मधून घडत आहेत. मागील महिन्यात कराडहून साताऱ्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता एका महाविद्यालयीन तरुणीवर शेतात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही
सातारा तालुक्यातील एका गावात दि.२८ सप्टेंबर राेजी सायंकाळी हि घटना घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २२ वर्षांची असून, ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि.२८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता ४० वर्षांच्या संशयिताने तरुणीच्या पायाला पकडून तिला गवतात ओढले. तिच्यावर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने पेट्रोलची बाटली दाखवून “मी तुला जाळून टाकीन,” अशी धमकी दिली. तसेच डोक्याचे केस ओढून हाताने बुक्क्यांनी मारहाण करून तिच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला.
पीडित तरुणीला शेतात ओढल्यानंतर संशयिताने तिचा ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा अवस्थेतही पीडित तरुणीने आरडा ओरड करून संशयिताच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. घरी गेल्यानंतर शेतात घडलेला प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना समजला. या प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयितावर विनयभंगसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हवालदार आशिष कुमठेकर हे अधिक तपास करीत आहेत.