सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अजूनही सावकारीच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवानीचे प्रकार सुरू आहे. या सावकारी प्रकारावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. दरम्यान, जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दलीचे पैसे व्याजासह परत करूनही साडेसहा कोटी रुपयांची मागणी करत दमदाटी केल्याप्रकरणी खटाव तालुक्यातील वडूज येथील सावकारावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज विठ्ठल माने असे सावकारीचा गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. धनाजी दादासाहेब जगताप (रा. बलराज पार्क, एकसळ, ता. कोरेगाव) यांच्या फिर्यादीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी जगताप यांची मनोज माने याच्याशी ओळख झाली. त्याचा फायदा घेत मनोज माने याने धनाजी जगताप यांचा विश्वास संपादन केला. यातून मनोज माने याने धनाजी यांना १७ सप्टेंबर २०१८ ला दुपारी तीन वाजता ते १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत दुपारी दीड वाजता असे वेळोवेळी एकसळ येथील बलराज पार्कमधील जवाहरलाल गणपत भोसले यांच्या घरी येऊन तसेच वडूज येथे ८५ लाख रुपये दिले होते. या रकमेच्या बदल्यात मुद्दल व व्याजापोटी धनाजी यांनी मनोज माने याला सात कोटी ६० लाख रुपये दिले होते.
मात्र, तरीही मनोज माने याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारासाठी घेतलेली मुद्दल रक्कम ठेवून व्याजाची रक्कम मला परत करा, अशी मागणी करीत होता. त्यातून धनाजी यांना बलराज पार्क एकसळ, वडूज आणि सातारा शहरातील करंजे येथे तसेच साताऱ्याच्या विसावा नाक्यावरील धनाजी यांच्या कार्यालयाबाहेर येऊन शिवीगाळ, दमदाटी करून व्यवहारातील साडेसहा कोटी रुपये रक्कम मला परत दे, नाही तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.