सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्याकडून ऊसतोडणी व वाहतूक करण्यासाठी दिलेली ७४ लाखांची रक्कम घेऊन दुसऱ्याच कारखान्याची ऊसतोडणी व वाहतूक करून फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाकी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बळीराम वायकर, सारंग कोंडीबा गायकवाड, शहाजी केरा गायकवाड, छगन प्रल्हाद साठे, हनुमंत आबा वायकर, रमेश बलभीम पोडमल, संजय अर्जुन पोडमल, विनोद बळीराम वाईकर, श्रीधर तुकाराम जगताप (सर्व रा. वाकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत औंध पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, ग्रीन पॉवर शुगर्स या कारखान्याला ऊसतोडणी वाहतूक करार २१ जून २०२२ रोजी करून ऊसतोडणी व वाहतूक करण्याकामी येण्यासाठी २२ जुलै २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत कारखान्याच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कडेपूरच्या
खात्यावरून ७४ लाख रुपये दिले होते.
आरोपींनी आपापसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्रीन पॉवर कारखान्याने दिलेल्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करून इतर कारखान्यांना ऊस वाहतूक करून कारखान्याची फसवणूक केली असल्याची फिर्याद चंद्रकांत जगनाथ मोहिते हेड क्लर्क शेती विभाग, ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज यांनी दिली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. ए. ठिकणे तपास करीत आहेत.