पालघरमधील ऊसतोड मजूर सुखरूप स्वगृही, 4 जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पालघरमधील जव्हार, मोखाडा तालुक्यातून सातारा येथे उड तोडणीच्या कामाला गेलेल्या मजुरांची श्रमजीवी संघटनेच्या पथकाने सुखरूप सुटका केली. मजुरांवर अत्याचार केल्याप्रकरणी साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात चार जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील एकूण १० कुटुंबे ऑक्टोबर २०२३ मध्ये सातारा येथे उसतोडीच्या कामाला गेले होते. यातील चार कुटुंबे तेजस यादव या ठेकेदाराकडे आणि सहा कुटुंबे नामदेव खरात या ठेकेदाराकडे काम करत होते. दरम्यान ठेकेदारांकडून कामगारांवर अत्याचार सुरू झाले. वेळेवर पगार न देणे, ठरल्यापेक्षा अधिक काम करून घेणे, शिवीगाळ, मारहाण करणे असे प्रकार होत असल्यामुळे तेजस यादव याच्याकडे काम करणारे 4 कुटुंबे काम सोडून घरी परतले.

यामुळे तेजस यादव याने उर्वरित सहा कुटुंबातील म्होरक्या कृष्णा नडगे याला दोषी ठरवले. तसेच ठेकेदार नामदेव खरात यांच्याशी संगनमत करून कृष्णा नडगेला तब्बल सहा दिवस एका खोलीत डांबून ठेवत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याविषयी कृष्णा नडगे यांनी एक चित्रफीत तयार करून प्रसार माध्यमांवर व्हायरल केली.

यानंतर हा प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेच्या एका पथकाने घटनास्थळी जाऊन कामगारांची सुटका केली. याविषयी साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात ठेकेदारासह अन्य चार जणांवर बंधपत्रित कामगार व्यवस्था (निर्मूलन) कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे.

श्रमजीवी संघटनेच्या मदतीने कातकरी समाजातील मजुरांची सुटका झाली असून मंगळवारी (९ जानेवारी रोजी) सहा कुटुंबातील १२ मजूर आणि १४ बालके असे एकूण २६ जणांची सुटका केली. तसेच त्यांना स्वगृही परत आणण्यात आले.