सातारा प्रतिनिधी | महिन्याला साडेसहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा व पुण्याच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल शंकर पंडित (मूळ रा. नायकाचीवाडी, बाकेश्वर, ता. खटाव, जि. सातारा, सध्या रा. दुबई), श्रीकांत सुदाम मोरे (देहूगाव येलवाडी, ता. हवेली, जि. पुणे) व दत्तात्रय बबन देशमुख (रा. देशमुख आळी, मेढा, ता. जावळी, जि. सातारा) या तिघांविरोधात विशाल श्रीकांत पालखे (वय 32, रा. कुंभोज, ता. हातकणंगले) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर महिन्याला साडेसहा टक्के परतावा देतो, असे सांगून पंडित, मोरे आणि देशमुख यांनी पालखे यांचा विश्वास संपादन केला. तसेच मेसर्स इन्फोवे फायनान्शियल सोल्युशन प्रा. लि.सह अन्य वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून संगनमत व नियोजन करून सेमीनारमध्ये माहिती देऊन अनेक गुंतवणूकदारांचा या त्रिकुटाने विश्वास संपादन केला. त्यानंतर जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीतील जिल्हा बँकेसमोर असलेल्या महावीर हाईटस् फ्लॅट नं. एफ. 2 या ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांकडून जादा परताव्याच्या आमिषाने रक्कम स्वीकारण्यात आली.
फिर्यादी विशाल पालखे यांची 10 लाख 19 हजार 500 रुपये व इतर काही गुंतवणूकदारांची 90 लाख 20 हजार इतकी, अशी एकूण 1 कोटी 39 हजार 500 रुपयांची 2 ऑक्टोबर 2021 ते 6 मार्च 2022 या कालावधीत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.