पुणे – सातारा रस्त्यावर धावत्या कारला भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कर पूर्णपणे जळून खाक झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावरुन कार कात्रजकडे निघाली होती. पद्मावती बसथांब्याजवळ कार आली असता त्यातून अचानक धूर येऊ लागला. यावेळी कारमधील चालकाने प्रसंगावधान राखून कार रस्त्याच्या बाजूला नेऊन उभी केली. त्यानंतर लगेचच कारमधील चालक व महिला त्वरित कारमधून उतरून बाहेर पडले.

दोघेही बाजूला जाताच काही मिनिटात कारने पेट घेतला. कारमधून भीषण आग व धुराचे लोट बाहेर येऊ लागल्यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले तसेच आग भडकल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. कारमध्ये शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता जवान सचिन शिंदे यांनी व्यक्त केली.