सातारा प्रतिनिधी | सध्या महामार्ग तसेच घाट मार्गावर हिट अँड रन क्या घटना घडण्याची प्रमाण चांगलेच वाढले आहे. सातारा तालुक्यातील बोरणे घाटात ‘हिट अँड रन’चे प्रकरण समोर आले असून, कारने पाठीमागून दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केले. या अपघातानंतर जखमी दुचाकीस्वाराला अंधारात ठेवून चालकाने कारसह पलायन केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात दि. १५ रोजी रात्री सव्वादहा वाजता बोरणे घाटात झाला.
रमेश आनंदराव लोहार (वय ४८, रा. ठोसेघर, ता. सातारा, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) हे दि. १५ रोजी रात्री दहा वाजता ठोसेघरहून दुचाकीवरून साताऱ्याकडे येत होते. कारी, ता. सातारा गावच्या हद्दीतील बौरणे घाटात पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये रमेश लोहार यांच्या हाताला तसेच पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती पोलिसांना न देता तसेच जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता कारचालक घटनास्थळा वरून काही अंतर पुढे गेला.
यानंतर दुचाकीस्वार रमेश लोहार हे अंधारात त्यांचा पडलेला मोबाइल शोधू लागले असताना त्याचवेळी परत कार वळवून कारचालक घटनास्थळी आला. रस्त्यावर पडलेल्या दुचाकीवरून कारचे पुढील चाक नेऊ ठोसेघरच्या दिशेने कारचालकान पलायन केले. त्यामुळे हा घातपाताचा तर प्रकार नाही ना, या अनुषंगानेही पोलिस माहिती घेत आहेत. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, पोलिस नाईक विशाल मोरे हे अधिक तपास करीत आहेत.