Satara News : पाचगणी भिलार वॉटर फॉल्स पॉईंटवरून कार दरीत काेसळली; 3 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तसेच जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी होय. सध्या सलग चार दिवस सुट्या लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, या ठिकाणी अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच घटना रविवारी घडली. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या एक कुटूंबियांची कार पाचगणीच्या भिलार वॉटर फॉल पॉईंटवर दरीत जाऊन कोसळली. यामध्ये कनिस विकणाऱ्या स्टॉल धारकासह एक जोतिषी व एक पर्यटक असे एकूण तीन जण जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील असणारे चार पर्यटक बचावले आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलग सुट्ट्या असल्यामुळे काही पर्यटक पाचगणीवरून महाबळेश्वरच्या दिशेने फिरण्यासाठी निघाले होते. त्यांची कार पांगारे फाट्यावर आली असता कारमधील चालकाचा अचानक ताबा
सुटला. कारमधील स्टेअरिंगवरचा ताबा सुटल्यानंतर कार थेट भिलार वॉटर फॉलच्या पॉईंटवरून रस्त्यालगत कनिसाच्या स्टॉलवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. स्टॉल धारक महिला अंजू नरेश लोहारा, जोतिषी गौरव दीपक गोंडे, तर कनसाच्या स्टॉलवर उभे राहिलेल्या पर्यटक सुनिता बरकडे (रा. नांदेड) या जखमी झाले.

कारमधील सर्व पर्यटक सुरक्षित

यावेळी झालेल्या आपघाताता स्टॉलला धडक दिल्यानंतर ही कार पुढे जाऊन खोल दरीत कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी कोणतीही झाली नाही. कारमध्ये बसलेले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुण्यावरून महाबळेश्वर फिरण्यासाठी आलेले कुटुंबीय या कारमधून प्रवास करत होते. या घटनेची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.