सातारा प्रतिनिधी | मंत्री व मंत्रालयातील सचिवांशी ओळख आहे. वाईन शॉप लायसन मिळवून देतो , असे सांगून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक शंकर रामुगडे व कलावती रामचंद्र चव्हाण, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी घनशाम चंद्रहार भोसले (वय 47, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली असून ते रिअल इस्टेट व्यवसायिक आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 2017 ते 2019 या कालावधीत घडली आहेत. तक्रारदार घनशाम भोसले यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की 2017 मध्ये त्यांचे मित्र तानाजी निकाळजे यांच्याद्वारे रामुगडे व चव्हाण यांची ओळख झाली. यातूनच त्यांना समजले की मंत्रालयातील अधिकारी ओळखीचे असून बदलीची कामे, फाईल मंजूर करणे व वाईन शॉप बारची लायसन्स ट्रान्सफर शिफ्टींगची कामे ते करतात. तक्रारदार भोसले व रामुगडे यांची मैत्री झाल्यानंतर 2018 साली चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्याने तेथील दोघांची वाईन शॉपची लायसेन्स विकायला आली असून ते तुम्ही घ्या, तुमचा फायदा होईल असा आग्रह रामुगडे याने भोसले यांच्याकडे धरला.
चंद्रपूर येथील वाईनचे लायसन 2 कोटी 50 लाख रुपयांना द्यायचे ठरले. त्यानुसार तक्रारदार भोसले यांनी रोख 30 लाख रुपये रामुगडे व कलावती चव्हाण या दोघांकडे गोडोली येथे राहत असलेल्या ठिकाणी दिली. यानंतर बँकेच्या आरटीजीएसद्वारे 10 लाख व पुन्हा रोख 20 लाख रुपये वेळोवेळी दिले. पैसे दिल्यानंतर लायसन नावे करण्यासाठी तक्रारदार भोसले यांनी पाठपुरावा केला. मात्र फाईल मंत्रालय प्रोसेसमध्ये आहे, ऑर्डर लवकर होईल, असे सांगून वेळ घेतला. यानंतर उडवाउडवीची उत्तरे देवून फोन उचलण्याचे बंद केले.
कामासाठी टाळाटाळ होऊ लागल्याने तक्रारदार भोसले यांनी संशयितांच्या गोडोली येथील फ्लॅटवर जावून पाहिले असता फ्लॅट बंद दिसला. तेव्हापासून दोन्ही संशयितांचा शोध घेतला असता त्यांनी पैसे दिले नाहीत व लायसनही नावावर केले नाही. यामुळे तक्रारदार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली