कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना पोलिसांच्या खासगी ट्रॅव्हल्सला गुहागर-विजापूर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. या अपघातात बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य १२ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कराडमधील सहयाद्रि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमी पोलीस हे तासगाव तालुक्यातील तुर्ची प्रशिक्षण केंद्रातील आहेत.
तासगाव तालुक्यातील तुर्ची प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांची लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी पाटण तालुक्यात नेमणूक करण्यात आली होती. बंदोबस्त आटोपल्यानंतर सर्वजण खासगी ट्रॅव्हल्सने परत निघाले होते. गुहागर-विजापूर महामार्गावर कराड विमानतळ मार्गावर ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला जावून धडकली.
या अपघातात संदीप पवार, लक्ष्मण सुतार व अजीत नलवडे, हे तीन पोलीस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य १२ जण किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलंय.
बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याची माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक के. एन. पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कराड शहर पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कराडमध्ये येवून जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक आणि ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.