सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील तावडी येथे दोन वळू इतर गावांतून गेल्या तीन दिवसांपासून दाखल झालेले आहेत. हे वळू गावातील गल्ली बोळातून फिरत असल्याने वळूच्या भीतीपोटी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. वाळूचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
तावडी गावात शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे आहेत. या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाईंच्या अंगावर वळू धावून जाऊन गायींना शारीरिक इजा पोहोचवत आहेत. यामुळे गावात असलेल्या प्राथमिक शाळेत वाडी-वस्तीवरून येणाऱ्या लहान मुलांच्या अंगावरही वळू धावून जात आहे. या घटना घडत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्यांना एकवेळ घरी बसवणे परवडले, अशी मानसिकता पालकांची झालेली आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या चारा पीक, फळबागा, पालेभाज्या व इतर पिकांची नासधूस त्यांच्याकडून होत आहे. वळूच्या भीतीने महिला घराबाहेर शेतात जाणे व इतर कामांसाठी बाहेर पडणे बंद झाले आहे. अनेकांच्या घरासमोरील दुचाकीही धक्का देऊन पाडत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वळूच्या भीतीने वाडी-वस्तीवरील लहान मुलांचे शाळेत जाणे बंदच झाले आहे. ग्रामस्थांनी या वळूला हटकण्याचा प्रयत्न केला असता अंगावर धावून बायेत आहे. वन विभागाकडे या वळूचा बाबंदोबस्त करण्याची लेखी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.