14 वर्षांनंतरही कराडच्या ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधवांच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा प्रश्न अधांतरीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असून त्याची ते उत्तरे देत आहेत. आतापर्यंत अधिवेशनात कराडचा विमानतळ, एसटी बसस्थानक प्रलंबित काम आदींचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र, ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा विषय काही अधिवेशनात उपस्थित केला गेलेला नाही. त्यामुळे 14 वर्षांनंतरही या ऑलिम्पवीराच्या कुस्ती परीक्षण संकुलाचा प्रश्न अधांतरीच राहिलेला दिसून येतोय. अशात कराड येथील प्रशासकीय इमारतीसमोर लावलेला कुस्ती संकुलाचा १४ वर्षाचा वनवास संपुष्ठात येणार का? असा सवाल करणारा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कराड तालुक्यातील गोळेश्वर गाव असलेल्या ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी वडिलांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या कुस्ती संकुलाच्या प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी कराड येथील प्रशासकीय कार्यालयासमोरच एक मोठे फलक उभारले आहे. त्या फलकाच्या माध्यमातून त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला प्रश्न विचारला आहे. ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या नावाने गोळेश्वर येथे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. याचा निर्णय ३० जून २००९ रोजी घेण्यात आलेला होता. मात्र, १४ वर्षे झाली तरी अद्यापप्रशिक्षण केंद्राचा प्रश्न सुटलेला नाही.

वास्तविक पाहता पैलवान खाशाबा जाधव अपघाती मृत्यू पूर्वी त्यांचे गुरुवर्य नागेश पुरंदरे यांना महिना दीड महिनापूर्वी भरले होते. त्यांच्याकडे त्यांच्या जन्मगावी गोळेश्वर येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आजपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी कराड येथील प्रशासकीय इमारती समोर फलक उभारून आंदोलन सुरु केले आहे. याकडे सध्या प्रशासनासह स्थानिक नेत्यांकडून देखील दुर्लक्ष केले जात आहे.

14 वर्षांपासून कुस्ती प्रशिक्षण संकुलाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष : रणजित जाधव

स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे काम माझे वडील पैलवान खाशाबा जाधव यांनी केले. त्यांच्या नावाने राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांचे जन्मगाव असलेल्या गोळेश्वर या ठिकाणी व्हावे म्हणून आम्ही गेली १४ वर्ष झाले पाठपुरावा करत आहोत. त्यांच्या कुस्ती संकुलाच्या प्रश्नी गेल्या महिन्यात क्रीडा मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये क्रीडाधिकारी व मंत्र्यांमध्ये काही विषयावर चर्चा देखील झाली. मात्र, त्यानंतर क्रीडामंत्री आणि संबंधित क्रीडाधिकारीच बदलले. आता पुन्हा नवे मंत्री आणि अधिकारी आले आहेत. यामध्ये क्रीडा संकुलाचा प्रश्न अजूनही अधांतरीच राहिला असल्याची प्रतिक्रिया पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकलं

सण 1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे स्वतंत्र भारतासाठी मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.

पोलीस अधिकाऱ्यांपासून ते पैलवान ऑलिंपिकवीर पर्यंत प्रवास

1955 मध्ये खाशाबा जाधव पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. पोलिस खात्यात 27 वर्षे नोकरी केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांचे अपघाती निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.