खटाव तालुक्यातील बोंबाळे गावात जुगाराचा मोठा अड्डा, आयोजकांकडून केली जाते जुगाऱ्यांच्या मांसाहारी जेवणाची सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अवैध व्यवसाय फोफावत चालले आहेत. त्याचा प्रत्यय आणून देणारी घटना खटाव तालुक्यातील बोंबाळे गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. बोंबाळे गावाच्या बाहेर जुगाराचा मोठा अड्डा चालत असल्याची बाब एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याने आयोजकांकडून जुगार खेळणाऱ्यांसाठी मांसाहारी जेवणाची खास मेजवानी दिली जात असल्याची माहितीही समोर येत आहे.

साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव, दहिवडी रोडशेजारी असलेल्या बोंबाळे गावच्या हद्दीत जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका शेतामधील शेडमध्ये हा जुगाराचा अड्डा असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. राजकीय लोक देखील जुगाराच्या डावात असल्याने पोलीस कारवाई करत नसल्याची चर्चा आहे. मोठ्या अर्थिक उलाढालीमुळे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या दारू आणि मांसाहारी जेवणाची देखील सोय त्याठिकाणी आयोजक करत आहेत.

अलिकडे सातारा जिल्ह्यात अवैध व्यवसाय वाढले आहेत. ढाबे, लॉज, परमिट रूम, ग्रामीण भागात देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. तरी देखील पोलीस अवैध धंदे बंद असल्याची टीमकी वाजवत आहेत. बोंबाळे गावातील जुगार अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती असूनही पोलीस मात्र या अड्ड्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे या जुगार अड्ड्याला पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

साताऱ्यासह शेजारच्या जिल्ह्यातील बुकी देखील जुगार खेळण्यासाठी खटाव तालुक्यात येत आहेत. स्थानिक पोलिसांच्या छुप्या वरदहस्तामुळे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच कारवाई करायला हवी, असा सूर नागरीकांतून उमटत आहे. जुगार अड्यावरील व्हिडिओ समोर आल्यामुळे आता पोलीस अधीक्षक समीर शेख काय कारवाई करणार, याकडे खटावकरांचे लक्ष लागून आहे.