कराड प्रतिनिधी | पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या राड्यानंतर हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाज बांधवामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही समाज बांधवांनी कराडात एकत्रित येत शांतता राखण्याचा निर्णय घेतला. आम्ही हिंदू- मुस्लिम समाज शांतताप्रिय असून कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. तसेच कराड शहरात तसेच कोणत्याही ठिकाणी मोर्चा काढणार नसल्याचे हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुखांनी कराड येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पोलिस प्रशासनाला आश्वासन दिले.
कराड येथे गुरुवारी अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाज बांधवांची बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर, अल्ताफ शिकलगार, फारुख पटवेगार, अजय पावसकर, चंद्रकांत जिरंगे, रूपेश मुळे, राहूल यादव, इसाक बागवान, रफिक मुलाणी, इसुफभाई पटेल यांच्यासह दोन्ही समाजातील प्रमुख लोक उपस्थित होते.
यावेळी पुसेसावळी येथील प्रकाराबाबत पोलिसांनी योग्य कारवाई सुरू असून कोणावर अन्याय होणार नसल्याचे सांगितले. तसेच समाजातील सर्वांचा विचार करून सर्वांनी येणारा गणेशोत्सव तसेच ईद- ए- मिलाद एकत्रित साजरी करून कराड शहराने एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी केले.
यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी पुसेसावळी या ठिकाणी झालेला प्रकार दुर्देवी असून यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी. परंतु, ज्यांचा या घटनेशी संबध नाही, त्यांच्यावर अन्याय होऊ नये. कराड शहरातच नव्हे इतरत्रही हिंदू किंवा मुस्लिम समाजातील कोणीही रस्त्यावर उतरणार नाही किंवा मोर्चा काढणार नसल्याचे दोन्ही समाज बांधवांनी सांगितले.