कराडातील इंदोलीत आढळला 7 फूट लांबीचा इंडीयन रॉक पायथन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथे शनिवारी संध्याकाळी एक मोठा दुर्मीळ असा भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) आढळून आला. याबाबतची माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर संबंधित अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, इंदोली, ता. कराड येथे वनपाल संदीप कुंभार यांच्या घराजवळ शनिवारी सायंकाळी भारतीय अजगर (इंडीयन रॉक पायथन) दिसून आला. कुंभार यांनी याबाबतची माहिती रेस्क्यू टीमला दिली. टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वनपाल संदीप कुंभार व सर्पमित्र अमोल पवार, रोहीत कुलकर्णी यांनी रात्री रेसक्यू करून अजगराला पकडले. सदर अजगराची लांबी 7 फूट, तर वजन 10.500 किलो होते. त्यानंतर रविवारी सकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक संतोष चाळके, अजय महाडीक, चालक योगेश बडेकर यांनी सदर अजगराला सुरक्षितस्थळी निसर्गात मुक्त केले.

भारतीय अजगर हे वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत शेड्युल 1 भाग 1 मध्ये संरक्षित करण्यात आले आहे. अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. अजगर बोजड व सुस्त असला तरी शिकार पकडताना तो अधिक वेगवान व आक्रमक होतो. भक्ष्य आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झेप घेऊन त्याच्या अंगाभोवती विळखे घालून तो त्याला घट्ट आवळतो. भक्ष्याच्या फुप्फुसावर आणि हृदयावर दाब पडल्यामुळे ते गुदमरून मरते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात.

जबड्याचा एकदा डावा भाग, तर एकदा उजवा भाग आळीपाळीने पुढे सरकवत अजगर भक्ष्य गिळंकृत करतो. याचे आयुर्मान सुमारे 30 वर्षे असते. अधिवास नष्ट होणे आणि अपुरे संवर्धन यांमुळे भारतीय अजगरांची संख्या सुमारे 30 टक्के इतकी कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने नजीकच्या काळात ही जाती धोक्यात येऊ शकते असे जाहीर केले आहे.