जिल्ह्यातील कासवर उद्या 5 तासांची ‘प्लास्टिकमुक्त कास’ विशेष मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेल्या कास तलावाभोवती मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. यामुळे सातारकरांना नळाद्वारे प्रदूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी सातारा पालिका व हरित सातारा ग्रुप यांच्या वतीने उद्या, रविवार, दि. ९ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त कास’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

येत्या पावसाळ्यात कास तलावात अधिक पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरा पाण्यात जाऊन दूषित पाणी पिण्याचा धोका सातारकरांवर ओढाव शकतो. त्याचप्रमाणे या परिसरात वावरत असलेले प्राण्याच्या पोटातही प्लास्टिक जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यावरणाचा हास होत आहे.

कास हा सातारकरांचा स्वाभिमान आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून सातारा नगरपालिकेसोबत हरित सातारा ग्रुप श्रमदानात सहभागी होत आहे. यामध्ये सातारा नगरपालिकेचे सुमारे चाळीस कर्मचारी हरित सातारा या पर्यावरणवादी ग्रुपचे २५ कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या स्वच्छता अभियानात ज्यांना स्वेच्छेने सहभागी व्हायचे आहे त्यांनी रविवार, दि. ९ रोजी सकाळी सात वाजता कास तलावाजवळच्या बंगल्याजवळ पोहोचावे, असे आवाहन सातारा नगरपालिका व हरित सातारा ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.