सातारा-महाबळेश्वर मार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावरून 40 फूट खोल कार कोसळली; चार जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा – महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीच्या पुलावरून कार चाळीस फूट खोल कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील करहरमधील एक कुटुंबीय महाबळेश्वरहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी जावळी तालुक्यातील आंबेघर येथील गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाचा छोटा संरक्षक कठडा तोडून वेण्णा नदीत कोसळली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर माेठा आवाज झाल्याने आंबेघरमधील ग्रामस्थ तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना नदीतून बाहेर काढले. कोणाच्या डोक्याला तर कोणाच्या हातापायाला जखम झाली.

तब्बल चाळीस फुटांवरून कार नदीत कोसळल्याने कारचेही मोठे नुकसान झाले. पाण्यात कार कोसळल्याने कारमधील लोकांना फारसी जखम झाली नाही. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली आहे. महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर परिसरात असणाऱ्या पुलावर कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे नाहीत. तसेच दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवख्या वाहन चालकाला रस्त्याच्या अंदाज येत नाही. परिणामी अशाप्रकारे अपघात होत आहेत.