कराड प्रतिनिधी । महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील पोलिस कॉन्स्टेबल नितीन पोवार यांचा समावेश आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड, ता. कराड हद्दीत शनिवारी दुपारची १२ : ४५ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी आणि कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत हॉटेल भाग्यलक्षी नजीक एक मालट्रक बंद पडला होता. दरम्यान, कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्या वॅगनर कारने (क्र. MH 01 AL 5458) मालट्रक (क्र. MH 19 CY 5350) ला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील पोलिस कॉन्स्टेबल नितीन बापूसाहेब पोवार (वय 34, रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव (वय 31) आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
पुणे-बंगळूर महामार्गावर कराडच्या पाचवडजवळ चारचाकी गाडी-ट्रकचा भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
पोलीस घटनास्थळी दाखल… pic.twitter.com/qomREOlgpJ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 14, 2023
मृतांमध्ये कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे कॉन्स्टेबल नितीन पोवार तसेच भारती जाधव यांचा समावेश आहे. अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही. कोल्हापूरहून ते पुण्याकडे चालले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
कराडजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली. तसेच पोलीस सहकार्यांनी नितीन पवार यांना समाज माध्यमांवर श्रध्दांजली वाहिली. पुणे-बंगळुरू महामार्गावर अलिकडे झालेला हा सर्वात भीषण अपघात आहे. अपघातावेळी मोठा आवाज झाल्यानंतर आजुबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. हायवे मदत केंद्राचे दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी तसेच कराड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले. एक मृतदेह अक्षरश: ओढून काढावा लागला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.