सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील अतिट येथील ग्रामदैवताच्या यात्रेकरता आलेला ३५ वर्षीय युवक धोम बलकवडी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची घटना रविवारी घडली.
मच्छिंद्र ऊर्फ किरण गोपाळ रोमन (वय ३६, रा. पांडेश्वर, ता. पुरंदर जि. पुणे) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अतिट, ता. खंडाळा येथील ग्रामदैवत मंडाईदेवी मातेची वार्षिक यात्रा असल्याने रोमणवाडी, जि. पुणे येथील मच्छिंद्र रोमण हा नातेवाईकांकडे आला होता. दरम्यान, उन्हाचा तडाखा असल्याने व मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असल्याने अतिट येथील ७ ते ८ युवक हे धोम बलकवडी कॅनॉलमध्ये पोहण्याकरता गेले होते. त्यांच्याबरोबर मच्छिद्र रोमण हा युवकही पोहोण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरला.
कॅनॉलमध्ये पाण्याचे उन्हाळी आवर्तन मोठ्या प्रमाणात सोडले असल्याने व पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मच्छिंद्र रोमण हा पाण्यामध्ये संबंधित पोहणाऱ्या युवकांच्या डोळ्यादेखत बुडाला. मच्छिंद्र पाण्यामध्ये बुडाल्याचे पाहून युवकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरवळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोनि यशवंत नलावडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय संकपाळ, गृहरक्षक दलाचे सचिन इंगवले, मनोज नरुटे यांच्यासह शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते