NDRF चे पथक आले हो…; 30 जणांचे पथक सातारा जिल्ह्यातील कराडात झाले दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यातील कराडमध्ये मंगळवारी दुपारी दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे.

कराड येथे दुपारी दाखल झाल्यानंतर पथकातील टीम कमांडर सुजीत पासवान, निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेतली.

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा आदी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. तर काही नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाणी पात्राबाहेर पडलेले. त्याचबरोबर पश्चिम भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावावर आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्यामुळे जिल्हा प्रशासन पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना करते. तसेच नागरिकांच्या जीविताचीही काळजी घेते. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक बोलवण्यात येते. यावर्षीही हे पथक आले आहे.

पावसाळ्याच्या काळात पथक कार्यरत राहणार आहे. तसेच पूरप्रवण आणि नागरिकांना धोका निर्माण होईल अशा ठिकाणी मदतीसाठी जाणार आहे. त्यातच कराड येथे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो. त्यामुळे अतिवृष्टीत कृष्णा नदीला पूर येतो. अशा काळात या पथकाची मोठी मदत होणार आहे.

कराड तालुक्यात ५५ तर जिल्ह्यात १७२ गावांना पुराचा धोका

जिल्हा प्रशासनाने नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक गावे ही कराड तालुक्यात ५५ आहेत. तर जिल्ह्यात १७२ गावांना पुराचा धोका राहतो. या गावांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही पूरस्थितीच्या काळात दक्ष असणार आहे.

पथकात 2 पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी

कराड दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकात ३० जणांचा समावेश आहे. ही तुकडी पुणे येथून आलेली आहे. त्यांच्याबरोबर पूरस्थितीत मदत करण्यासाठी लागणारे साहित्यही आहे. या पथकात पोलिस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आहेत. टीम कमांडर सुजीत पासवान, निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक असेल. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यातच नदीकाठच्या रहिवाशांसाठी पूरस्थितीतील धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये पोलिस, होमगार्ड आदी सहभागी झालेले.