टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात 3 वर्षाची चिमुकली ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । टेम्पो पाठीमागे घेताना टेम्पोखाली सापडून अवघ्या तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराडच्या कार्वे नाका येथे घडली. स्वरा नितीन शिंदे (वय ३) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस चौकशी करत होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास सज्जन इंगवले हा चालक त्याच्या ताब्यातील मालवाहतूक टेम्पो कार्वे नाक्यावरील डवरी गल्लीत घेऊन गेला होता. त्याने ज्या ठिकाणी टेम्पो नेला होता, त्या परिसरात चिमुकली स्वरा खेळत होती. दरम्यान टेम्पो मागे घेत असताना रस्त्यात खेळणारी स्वरा त्या टेम्पोखाली चिरडली गेली.

अवघ्या काही क्षणात झालेल्या या अपघाताने स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत स्वराला रूग्णालयात हलवले मात्र तिचा वाटेतच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्तरांनी दिली. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, अपघात विभागाचे धीरज चतुर, हवालदार महाले यांच्यासह पोलीस घटनास्थळी आले.

अपघात विभागाच्या पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवला. अपघातप्रकरणी टेम्पोचालकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी स्वराच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे. या अपघाताने कार्वेनाका परिसरात हळहळ व्यक्त हात होती.