कराड प्रतिनिधी । दुपारच्यावेळी माळ रानात रेडकू चरण्यासाठी घेऊन गेलेल्या 20 वर्षीय तरुणावर काळाने घाला घातला. कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली. कॅनॉलच्या पाण्यात पडलेले रेडकू वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. संबंधित बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी आढळून आला.
प्रशांत लक्ष्मण दळवी (वय 20, रा. आर्वी, ता. कोरेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आर्वी गावात राहत असलेला प्रशांत लक्ष्मण दळवी हा शुक्रवारी गुरे घेऊन आर्वी गावच्या बाहेर बाळोबाच्या खिंडी परिसरातील माळरानात गेला होता. साधारणतः दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास तो रेडकूला घेऊन उरमोडी कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पाणी पाजण्यासाठी घेऊन गेला. यावेळी अचानक त्याचे रेडकू कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पडले. तसेच पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत जाऊ लागले. आपल्या रेडकूला वाचविण्यासाठी तर देखील आटापिटा करू लागला. तो कॅनॉलच्या कडेने धावू लागला. यावेळी त्या परिसरात असलेल्या काही शेतकऱ्यांनी त्याला धावताना पाहिले. पुढे जात या तरूणाने कॅनॉलमध्ये उतरत आपले रेडकू वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र, तो तलावात बुडाला.
त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी या घडलेल्या घटनेची माहिती प्रशांतचे वडीत लक्ष्मण जगन्नाथ दळवी यांना दिली. माहिती मिळताच तात्काळ सर्व दळवी कुटूंबातील लोकांनी घटनास्थळी जाऊन शोधाशोध केली असताना त्यांना चप्पल, टॉवेल, छत्री डबा, पिशवी अस साहित्य मिळून आले. दरम्यान, काही अंतरावर पाण्यात वाहून गेलेले रेडकू जखमी झालेल्या अवस्थेत मिळून आले. मात्र, प्रशांत काही केल्या सापडला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध गेल्याचे काम सुरु होते. यानंतर गावातील ग्रामस्थांनी उरमोडी कॅनॉलमधून सोडले जात असलेले पाणी थांबविण्याची विनंती केली.
दरम्यान, कॅनॉलमधून सोडले जाणारे पाणी थांबविल्यानंतर तलावातील पाण्याची पातळी कमी झाली. त्यानंतर शनिवारी पुन्हा तरुणाचे शोधकार्य सुरु करण्यात आले. या घटनेची माहिती घटना रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध घेतली असतात तसेच कॅनॉलमधील पाणी कमी झाल्याने प्रशांतचा मृतदेह झुडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला.