ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी ‘तिने’ दुचाकीचा वेग वाढवला; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दुचाकी चालवताना नेहमी सावधपणे चालवावी, वेगावर नियंत्रण ठेवावे, अशा सूचना पोलिसांकडून केल्या जातात. मात्र, पुढे निघालेल्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात आपण घेतलेला निर्णय हा आपल्या जीवाशी येतो याचा प्रत्यय आज पहायला मिळाला. सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगर जवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरूणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या रा. सदर बझार सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे.

मामाकडून घरी परतताना काळाचा घाला

दिशा घोरपडे ही शनिवारी सोनगाव, ता. सातारा येथे मामाकडे गेली होती. रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली. संगमनगर जवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली. मात्र, तिची दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रकखाली सापडली. त्यामुळे ट्रकचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचे चित्र विदारक होते.

छिनविच्छिंन्न मेंदू आणि रक्ताचा सडा…

दिशाचा ज्यावेळी अपघात झाला तेव्हा तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. छिनविच्छिंन्न मेंदू आणि रक्ताचा सडा पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार कारळे व हवालदार धनाजी यादव हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. या अपघामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी त्यांनी पूर्ववत केली. मृत तरूणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या अपघाताची माहिती मृत दिशा घोरपडे हिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर दोघेही सिव्हिलमध्ये आले.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारा होता. दिशा ही साताऱ्यातील यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील शिक्षक असून, तिला एक बहीण आहे. मृत तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन करून उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.