सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या इतिहासात भर पडली असून रविवार पेठ येथे १३ व्या शतकातली गद्धेगळ सापडली आहे. वाईला लाभलेला प्राचीन इतिहास त्यात नव्याने उजेडात येत असलेले वाई परिसरातील संशोधन यामुळे वाईच्या इतिहासात नवनवीन अज्ञात असलेले पाने जोडली जात आहेत. त्यात अजून एक पान जोडले जात आहे ते म्हणजे रविवार पेठ येथील परटाचा पार येथे असलेली गद्धेगळ.
गद्धेगळ ही शिळा म्हणजे एक समजली जाणारी शापवाणी, विरगळींप्रमाणे गद्धेगळाचा उगम हा शिलाहार कालीन आहे. गद्धेगळ ही शिळा शिल्प जास्त करून शिलाहार व यादव यांच्या राजवटीत कोरण्यात आली आहेत. एकदा राजा जमीन दान करतो. ही जमीन कोणी बळकावून घेऊ नये आणि ही जमीन बळकावून घेतलीच राजाज्ञा मोडली तर त्याची गय करणार नाही हे दर्शवण्यासाठी गद्धेगळ कोरले जात असे.
जर कोणी दिलेल्या दानाचा दुरुपयोग केला किंवा नियम मोडला तर काय शिक्षा होईल हे सांगणारे हे शिळाशिल्प आहे. शिळेच्या वरच्या बाजूस सुरू चंद्र आणि मध्ये कलश कोरलेला असतो. या सूर्य-चंद्र चा अर्थ असा होतो की जो पर्यंत ह्या सृष्टीवर चंद्र-सूर्य आहेत तो पर्यंत दान दिलेल्या राजाची कीर्ती आसमंतात कायम राहील ते हे वरील तीन शिल्प सांगता. शिळेच्या मध्यभागी गाढव व स्त्रीचे संभोग करतानाचे शिल्प कोरलेले असते.
शिव मंदिर असेल तर त्या मंदिराच्या आवारात गद्धेगळ पाहायला मिळते. एखाद्या राजाने आपल्या सरदाराला जमीन दान दिली असेल, त्या जमिनीच्या हद्दीला लागून ही शिळा ठेवली जाते. एखाद्या राजाने नवीन गाव किंवा शहर वसवले असेल तर त्या शहराची हद्द सुरू होते तिथे हे गद्धेगळ ठेवले जाते. स्कंदपुराणांतर्गत, कृष्णा महात्म्यात वाईचा उल्लेख वेराजक्षेत्र असा उल्लेख आढळतो, विराटनगर म्हणून देखील वाईला ओळखले जाते. किवरा ओढ्याकाठी मिळालेले क्षुद्राष्म हत्यारे, वरवंटा, पाटा, खापरे हे निवडक अवशेष प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवते.
कीवरा ओढा म्हणजे आताचे रविवार पेठ येथील पूर्व बाजू. यावरून एक गोष्ट लक्ष्यात येथे की जुनी वाई ही आताचे रविवार पेठ. वाई परिसरातील किल्ले आणि मंदिरे. परिसातील किल्ले हे शिलाहार राजा भोज दुसरा ह्याने बांधलेले आहेत, तर मंदिरे ही यादव व पेशवे राजवटीतील आढळून आले आहेत. यामुळे ही गद्धेगळ १२ वे ते १४ वे शतक याच्या आतील असण्याची शक्यता वाटते, आमच्या अंदाजे ही गद्धेगळ १३ व्या शतकातील असण्याची दाट शक्यता आहे.