वाईत 13 वर्षीय शाळकरी मुलीचा ST बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. येथील बसस्थानकात एसटी बसच्या चाकाखाली सापडून सातवीत शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे.

श्रावणी विकास आयवळे (वय 13, रा. सुलतानपुर, ता. वाई) असे जागीच मृत्यू झालेल्या शाळकरी विद्यार्थीनीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे श्रावणी आपल्या मैत्रिणीसोबत शाळेसाठी आली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती मैत्रिणीसोबत एसटी बसमध्ये बसण्यासाठी आली. वाई बालेघर एसटी गाडी (क्रमांक MH 14 BT 0496) ही बस बसस्थानकावरील फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. अशात श्रावणीला धक्का लागल्यामुळे ती खाली कोसळली. गाडीच्या मागच्या बाजूस पडल्यामुळे यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले.

अचानक एसटी बसच्या चाकाखाली ती चिरडली गेल्यामुळे एकच गर्दी झाली. चाकाखाली सापडून मृत्यू झालेली श्रावणी ही वाई तालुक्यातील सुलतानपुरची होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले (वय 36, रा. नांदवळ) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.