सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात वर्षभरापूर्वी ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ मध्ये १५६ तलाठी पदांची भरती परीक्षा पार पडली होती. सुमारे २५ हजारांहून अधिकजणांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा पार पडल्यानंतर १५५ जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जे उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले त्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नसल्याने ते सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यात एकूण १५६ तलाठी पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी तब्बल ३० हजार ४३६ अर्ज प्राप्त झाले तर प्रत्यक्षात २५ हजारहून अधिक जणांनी परीक्षा दिली होती. त्यावेळी महत्वाच्या अशा या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील 7 परीक्षा केंद्रांवर 3 सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. तयावेळी तलाठी भरतीची परीक्षा प्रथमच टीसीएसमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
या परीक्षेनंतर तब्बल सहा महिन्यांनी परीक्षेचे सामान्यकृत गुण ६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झाले आणि अंतिम निवड यादी तयार होऊन मार्च महिन्यात पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील १५५ जणांची यादी जमाबंदी आयुक्तांकडून देण्यात आली आहे. मात्र, त्यांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसून या उमेदवारांच्या आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी शासकीय कार्यालयात सुरू आहे.