खोजेवाडी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम, कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यास तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष भेट

0
17
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कुटुंबातील एखादी व्यक्ति मृत्यू पावल्यास तिच्या पश्चात तिच्या स्मृती राहाव्यात म्हणून काहीजण त्या व्यक्तीच्या नावे उपक्रम राबवितात. मात्र, सातारा तालुक्यातील खोजेवाडी गावात एक अभिनव असा उपक्रम राबविण्यात आला आहे. गावातील कोणत्याही कुटुंबातील व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीची आठवण म्हणून स्मृतिप्रीत्यर्थ त्याच्या नावे एक आंब्याचे रोप दिले जाणार आहे. गावातील श्री साहेबराव घोरपडे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी कुटुंबीयांची भेट घेत त्यांना एक आंब्याचे रोप दिले. तसेच त्या रोपांचे संगोपण करण्यास सांगितले.

यावेळी खोजेवाडी गावच्या सरपंच वैशाली घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हिराबाई रामचंद्र घोरपडे, मनीषा नंदकुमार सातपुते, ग्रामपंच्यात सदस्य अशोक मदने, ग्रामस्थ आनंदराव घोरपडे, ग्रामपंचायत कर्मचारी संदेश घाडगे यांनी गावातील साहेबराव घोरपडे यांच्यासह त्यांच्या मुली, सुना व नातू यांची भेट घेत त्यांना रोप दिले.

खोजेवाडी गावच्या सरपंच वैशाली घोरपडे यांनी अभिनाव उपक्रम राबवित त्यामध्ये गावातील इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांनाही सहभागी करून घेतले. रोपाच्या माध्यमातून कुटुंबातील मृत्यू वापलेल्या व्यक्तीच्या स्मृती चिरंतर राहतील यासाठी सरपंच घोरपडे यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे साहेबराव घोरपडे व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी कौतुक देखील केले आहे.

गावातील प्रत्येक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य घोरपडे कुटूंबाच्या दुःखात सहभागी : वैशाली घोरपडे

गावात कोणत्याही कुटूंबातील व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी होत असतो. तसेच यापुढे देखील सहभागी राहू. त्या कुटूंबाची भेट घेत त्याच्या दुःखात सहभागी होत जो सदस्य मरण पावला आहे त्याच्या नावे आंब्याचे रोप देणार आहोत. अशी आजपासून आपण आपल्या गावामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमध्ये ज्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यू पावेल त्याच्या कुटुंबाला आपण त्या व्यक्तीची आठवण म्हणून स्मृतिप्रीत्यर्थ एक आंब्याच रोप देत आहोत. या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याची माहिती खोजेवाडी गावच्या सरपंच वैशाली घोरपडे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.