सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच करण्यात आला आहे. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे दालन (मॉडेल) व ऐतिहासिक माहिती आता सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पाहावयास मिळणार आहे.
गेल्या वर्षभरात युनेस्कोच्या पथकाने किल्ल्यांना भेटी देऊन पाहणी केली होती. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड व छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला ४ ऑक्टोबर २०२४ रोजी भेट देऊन माहिती घेतली होती. या संग्रहालयात असणाऱ्या प्रतिकृतींची पाहणी करून पथकाने माहिती घेतली. आता पुढील काळात या प्रतिकृतींमध्ये बदल करून माहितीरूपी दालन तयार केले जाणार आहे. जेणेकरून, जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या गडकिल्ल्यांचे वैभव शिवप्रेमींना एकाच ठिकाणी पाहावयास मिळणार आहे.
तयार केल्या जाणाऱ्या माहितीरूपी प्रतिकृती दालनात महाराष्ट्रातील ११ किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, तर तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश असणार आहे. या किल्ल्यांची सविस्तर ऐतिहासिक माहिती व प्रतिकृती एकाच दालनात शिवप्रेमींना पाहता येणार आहेत. सांगली येथील आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कलाशिक्षक रमेश बलुरगी यांनी. त्यांच्या या कलाकृतींचे सध्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे.
‘युनेस्को’ला सादर केलेली किल्ल्यांची प्रतिकृती
‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नुकताच महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. यात सातारा जिल्ह्यातील प्रतापगड तसेच रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती दिल्लीतील ‘युनेस्को’च्या अधिवेशनात सादर करण्यात आल्या होत्या. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आणि त्यांच्या चमूने या प्रतिकृती ‘युनेस्को’समोर सादर केल्या. ‘युनेस्को’च्या सदस्यांनी या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचे कौतुक केले.
कलाकृती निर्मितीची प्रक्रिया…
कागदाचा लगदा, ॲक्रेलिक रंग, फेव्हिकोल, सनबोर्ड आणि लाकडाचा भुसा यांसारख्या साहित्याचा वापर करून हे किल्ले तयार करण्यात आले. रायगड आणि राजगड या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे वजन सुमारे ३५० किलो असून, इतर किल्ल्यांचे वजन ८० ते १५० किलो आहे. त्यांची सोयीस्कर वाहतूक करता यावी, यासाठी चाके लावलेल्या लोखंडी फ्रेमचा वापर करण्यात आला.