सातारा एसटी विभागाला विठुमाऊली पावली; 1 लाख 13 हजार 879 वारकऱ्यांनी केला प्रवास

0
225
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने भाविकांसाठी विशेष एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. सातारा विभागातील 11 आगारातील 256 बसेसच्या माध्यमातून 1 लाख 13 हजार 879 वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन घडवले. यातून 1 कोटी 32 लाख 42 हजार 270 रुपयांचा विक्रमी महसूल एसटी विभागास प्राप्त झाला आहे.

पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने जादा बसेसचे नियोजन केले होते. दि. 2 ते 13 जुलैअखेर सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, मेढा, दहिवडी, वडूज या 11 आगारातून भाविक व वारकर्‍यांच्या सोयीसाठी सोडण्यात आल्या. तसेच पंढरपूरहून थेट गावी जाण्यासाठी 40 अथवा त्यापेक्षा जास्त वारकर्‍यांनी एकत्रित मागणी केली होती.

त्यानुसार 10 ठिकाणी बसेस सोडण्यात आल्या. सातारा विभागातील 11 आगारातील 256 बसेसचे 2 लाख 28 हजार 784 किलोमीटर झाले. तर 1 हजार 377 फेर्‍यांमधून 1 लाख 13 हजार 879 भाविक वारकर्‍यांची सेवा करण्यात आली. या वाहतुकीमधून सातारा विभागास 1 कोटी 32 लाख 42 हजार 270 रुपयांचा महसूल मिळाला. या उल्लेखनीय सेवेमुळे हजारो वारकर्‍यांचा पंढरपूर प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला.