कराड प्रतिनिधी । अनेकवेळा वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जातात. मात्र, वन्य प्राण्यांची शिकार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. रान डुक्करांची शिकार केल्या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथील शेतात बेकायदेशीररीत्या रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रतीक संपत सुर्वे, प्रविण शिवाजी सुर्वे आणि रामचंद्र ज्ञानू जाधव (सर्व रा. आबईचीवाडी, ता. कराड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कराड तालुकयातील आबईचीवाडी येथील पांडुरंग किसन सुर्वे यांच्या शेतात वन्यप्राणी रानडुक्कराची बेकायदेशीर शिकार झाल्याची माहिती वन विभागाला दि. १० जुलै रोजी मिळाली. त्या गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाने संबंधित ठिकाणी वनविभागाने तत्काळ भेट देऊन तपास सुरू करून सापळा रचला.
याप्रकरणी प्रतीक संपत सुर्वे, प्रविण शिवाजी सुर्वे आणि रामचंद्र ज्ञानू जाधव (सर्व रा. अबईचिवाडी, ता. कराड यांना वन विभागाने ताब्यात घेतले. तसेच तपासात रानडुक्कराच्या मांसाचा उपयोग अन्न म्हणून केला जात असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत वन अधिकाऱ्यांनी आरोपींकडून घटनास्थळी रानडुक्कराचे मांस आणि अन्य शिकार सामग्री जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे (वन व वन्यजीव विभाग, सातारा), वनपरिक्षेत्र अधिकारी कराड श्रीमती ललिता पाटील, वनपाल संतोष जाधव, रमेश जाधव, सचिन खंडाळकर आणि अन्य वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली.