सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याची १०० टक्के साक्षरतेकडे वाटचाल सुरू असून यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याला लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे, तर मागील दोन वर्षांत परीक्षा देऊन ४५ हजार १०४ असाक्षर उत्तीर्ण झाले आहेत.
सातारा जिल्हा १०० टक्के साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमाची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा समाजकल्याण अधिकारीविद्यानंद चल्लावर, कौशल्य विकास अधिकारी सहायक आयुक्त सुनील पवार, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक शशिकांत माळी, डाएटच्या अधिव्याख्यता विद्या कदम, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय गिरी, डॉ. मिथुन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी साक्षरतेसाठी १५ वर्षांहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींत पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) आणि संख्याज्ञान विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याने दोन वर्षांपासून सुरू असलेल्या परीक्षेसाठी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या नवसाक्षरांमध्ये आजी-आजोबाही नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला बसत आहेत. यावर्षीची परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यानुसारच साक्षरता वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.