कराड प्रतिनिधी | सध्या बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून यावर पोलिसांकडून देखील कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई कराड तालुका पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणारा टेंपो पकडून पोलिसांनी दहा जर्सी जातीच्या गायींची सुटका केली तर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे- बंगळूर महामार्गावरील नारायणवाडी- आटके टप्पा येथे ही कारवाई करण्यात आली.
हमद मगतुमसाब हुसेन (रा. दावनगिरी, कर्नाटक) व लिंगेशा एस. गोपाळ (ता. जि. दावणगिरी, कर्नाटक) असे ताब्यात घेतल्यांची नावे आहेत. ओम विजय शेरकर (रा. रहिमतपूर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुकयातील रहिमतपूर येथील ओम शेरकर हे गुरुवारी सकाळी कामानिमित्त येथे आले होते. त्यावेळी कराडला आठवडी बाजारातून एका टेंपोतून गायींची बेकारीशीरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने संबंधित टेंपोचा पाठलाग करून नारायणवाडी गावच्या हद्दीत आटके टप्पा येथे तो टेंपो थांबवला.
टेंपोची तपासणी केल्यावर त्यात जर्सी जातीच्या दहा गायी दाटीवाटीने ठेवल्याचे आढळून आले. त्या गायींची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याप्रकरणी, बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.