सातारा प्रतिनिधी । अलीकडच्या काळात डबल पैसे करून देतो असे सांगत पैशांसाठी फसवणूक करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र चक्क दक्षिण भारत, गंगासागर तसेच दुबई या ठिकाणी नेण्याचे आमिष दाखवत पैसे घेऊन फसवणूक केल्याची घटना सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याचे दिसून येते. उत्तर आणि दक्षिण भारत तसेच दुबईत कंपनीची ट्रीप जाणार आहे म्हणून बुकींसाठी पैसे घेऊन १५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
जयवंत रामचंद्र वारागडे (वय ५९, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून त्यांच्या तक्रारीवरून मयुरेश वाघ, काजल निमसे, सपना वाघ, शुभांगी कदम, अनुजा आणि सुवर्णा भालेराव (संपूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागीलवर्षी ३० जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत हा प्रकार घडलेला आहे. संशयितांनी उत्तर भारत, दक्षिण भारत, गंगासागर तसेच दुबई या ठिकाणी कंपनीची ट्रीप जाणार आहे असे सांगितले होते.
त्यानंतर फिर्यादीकडून बुकींगसाठी पैसे घेतले. अशाप्रकारे १५ लाख ३६ हजार ९५० रुपये घेण्यात आले होते. पण, नंतर ट्रीपला नेले नाही. तसेच सहलीसाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सातारा शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच पुढील तपास सुरू झाला आहे.