सातारा प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे घाट मार्गावर सतत दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवास धोका उद्भवत आहे. अशात सातारा आणि रायगड जिल्ह्याना जोडणाऱ्या पोलादपूर जवळच्या आंबेनळी घाटात मोठी दरड कोसळण्याची घटना घडल्याने ही दरड हटवण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार आहेत. त्यामुळे हा घाट पाच ते सहा दिवस संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
पोलादपूरकडून महाबळेश्वरला जाणाऱ्या वाहनांना रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसंच महाबळेश्वरकडून पोलादपुर कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असल्याचं प्रशासनाने जाहीर केलं आहे.
ही दरड कोसळल्यानं महाबळेश्वर ते पोलादपूर स्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सूचना देऊन सदरचा रस्ता बंद करणेच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याची विनंती असल्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे