महाबळेश्वरात हॉटेलसह घरफोडी करणाऱ्या कामगाराला मुंबई विमानतळावर अटक

0
361
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेलमध्ये साहित्याची चोरी करून परस्पर दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हॉटेल कामगाराला मुंबई विमानतळावर महाबळेश्वर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत चोरट्यांकडून १७ लाख ९० हजार ८५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी दिली.

कांचन काली प्रसाद बॅनर्जी (नालासोपारा, वसई) , करण दशरथ घाडगे ( आंबवडे खुर्द, ता. सातारा), गौतम सुरेश जाधव (यशवंत नगर, सैदापूर ता. सातारा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २५ ते २८ जून दरम्यान महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये चोरी झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती. हॉटेलचा वॉचमन कांचन बॅनर्जी याने हॉटेलमधील सामान थोडे थोडे करून परिसरातील भंगार व्यावसायिकांना विकले आणि तेथून तो दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी या चोरीचे तांत्रिक विश्लेषण करून मुंबई येथील सहारा विमानतळावर कागदपत्रे तपासत (चेक इन) असताना बॅनर्जी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर भंगार विकत घेणाऱ्या दोन्ही अन्य इसमांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्व सामान हस्तगत केले आहे.

बॅनर्जी दुबईला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, अमित माने, ओंकार यादव, सचिन ससाणे, रवी वर्णेकर, नवनाथ शिंदे या पथकाने ही कारवाई केली.