सातारा प्रतिनिधी । पावसाळी वातावरण असल्याने शनिवार आणि रविवार सुट्टी दिवशी पर्यटक ठोसेघर या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी जात आहेत. दुचाकी, चारचाकीमधून सातारा ते ठोसेघर या प्रमुख पर्यटन जात असताना त्यांना खुदाई करण्यात आलेला रस्ता लागत आहे. केबल टाकण्यासाठी केलेल्या बेजबाबदार खुदाईमुळे आणि वळणांवरील वाढलेल्या झाडीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला वाहने चिखलात रुतत असून, समोरील वाहने न दिसल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
साताऱ्यातील परळी खोर्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, सज्जनगड यांसारखी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि धबधब्यांमुळे या रस्त्यावर पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, बांधकाम विभागाने केबल ठेकेदाराला दिलेल्या परवानगीचा गैरवापर होत असल्याचे चित्र आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर चर व्यवस्थित न बुजवता केवळ माती टाकल्याने रस्त्याच्या कडेची साईडपट्टी धोकादायक बनली आहे. वाहनचालकाने थोडे जरी वाहन बाजूला घेतले, तरी ते थेट चिखलात रुतते, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत.
भोंदवडे, गोळेवाडी, डबेवाडी परिसरात रस्त्याच्या वळणांवर वाढलेली झाडी थेट रस्त्यावर आल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. ही धोकादायक परिस्थिती महिनाभरापासून कायम असतानाही बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.