सातारा जिल्ह्यातील तब्बल 1500 गावांतील स्वच्छतेची होणार पडताळणी

0
121
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमाद्वारे सातारा जिल्ह्यातील तब्बल 1,496 ग्रामपंचायतींच्या स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा तपासल्या जाणार नसून, घरोघरी जाऊन नागरिकांच्या बदललेल्या मानसिकतेचा आणि स्वच्छतेच्या सवयींचाही आढावा घेणार आहेत.

या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि राज्य स्तरावर स्वच्छतेसाठी निरोगी स्पर्धा निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढवणे आणि मिशनअंतर्गत निर्माण झालेल्या सुविधांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा आहे. ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया ‘अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ या केंद्र सरकारद्वारे नियुक्त त्रयस्थ संस्थेमार्फत राबवली जाईल. जिल्ह्यातील गावांची निवड नमुना निवड पद्धतीने केली जाणार असून, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पारदर्शकपणे हे सर्वेक्षण होणार आहे.

सर्वेक्षणादरम्यान नियुक्त पथके गावांना भेटी देणार आहेत. यामध्ये कुटुंबस्तरावर वैयक्तिक शौचालयाचा वापर, हात धुण्याची सवय, ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी उपलब्ध सुविधा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी केलेले उपाय यांची पाहणी केली जाईल. तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जिल्हा व तालुका स्तरावर उभारलेले प्लास्टिक संकलन केंद्र, गोबरधन प्रकल्प आणि मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पांचीही तपासणी केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध माहितीच्या आधारे जिल्ह्याचे मूल्यांकन केले जाणार आहे.

अशा प्रकारे होणार ग्रामपंचायतींचे 1 हजार गुणांच्या आधारे मूल्यांकन

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण गुणांकन पध्दत (एकूण 1000 गुण), ऑनलाईन प्रणाली वरील प्रगती 240 गुण, गावातील प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण 540 गुण, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प थेट निरीक्षणासाठी 120 गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी 100 गुण असे एकूण 1000 गुणांच्या आधारे ग्रामपंचायत, जिल्हा, राज्य यांचे मूल्यांकन होणार आहे.