काले गावच्या नंदी यात्रेस उद्यापासून प्रारंभ; मर्दानी खेळांचे होणार प्रात्यक्षिक

0
548
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कालेसह कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे आराध्यदैवत असलेल्या काले येथील श्री नंदी देवाच्या यात्रेस बुधवारी ९ रोजी सकाळी प्रारंभ होत आहे. ही यात्रा बेंदूरसणापासून पाच दिवस चालणार आहे.

बुधवार ते रविवार अशी पाच दिवस यात्रा चालणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस रविवार असून रविवारी 13 रोजी दुपारी दोन वाजता श्री नंदीदेवाची मिरवणूक व्यंकनाथ मंदिरातून निघणार आहे. मिरवणूक चावडी चौक मार्गे शिवाजी चौकातून बाजारपेठ या ठिकाणी मिरवणूक आल्यानंतर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर व्यंकनाथ मंदिरामध्ये नंदी देवाचे स्थापनेला प्रारंभ झाला. यात्रेसाठी येथील कुंभार समाजातील भाविकांकडून चार फुटी नंदी देवाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावल्याने येथील शेतकरी पेरण्या व टोकणी करून यात्रेसाठी सज्ज झाला आहे. काले व परिसरात बेंदूर सण व यात्रेच्या तयारीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. व्यंकनाथ मंदिर व बाजारपेठ परिसरात नारळांची तोरणे, गुलाल व मिठाई तसेच इतर साहित्याचे स्टॉल उभारले जात आहेत.

बाजारपेठ जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात लहान मुलांच्या करमणुकीसाठी पाळणे, भेळ, पाणीपुरी, खाद्य पदार्थांचे स्टॉल करिता जागा मिळविण्यासाठी विक्रेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यंकनाथ मंदिर परिसरात स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहेत.