कराड प्रतिनिधी | साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्यावतीने 2025 वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, नवनियुक्त अध्यक्ष राम दाभाडे, प्रमोद तोडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले की, डॉ. आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठी लोक बिरादरी प्रकल्प शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरू केले आहे. आदिवासींना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम केले आहे. आदिवासींमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती सोहळ्यामध्ये त्यांना शेतमजूर, दुष्काळ निर्मुलन चळवळ, सांस्कृतिक चळवळ व श्रमिक मुक्ती आंदोलनाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे शुक्रवारी (दि. 22 ऑगस्ट) सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकावर सचिव हरिभाऊ बल्लाळ, कार्याध्यक्ष राहुल वायदंडे, उपाध्यक्ष कृष्णत तुपे, सुरज घोलप, रमेश सातपुते, अॅड. विशाल देशपांडे, रमेश सातपुते, गजानन सकट, संजय तडाखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.