सातारा प्रतिनिधी । सातारा लोणंद शिरूर मार्गावर वाडे फाट्या जवळील वेण्णा नदीवर दगडी बांधकामाचा जिना पूल असून या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. अनेक ग्रामीण भागातील गावांना जोडणारा हा महत्वाचा पूल असल्यामुळे या पुलावर वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या पुलावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी बरोबर अनेक अपघाताचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळते. या पुलावरून प्रवास करताना वाहनांसह नागरिकांची हाडे खिळखिळी होत आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून या पुलाची स्थिती कायम असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या पाच तालुक्यांच्या दृष्टीने दळणवळणासाठी महत्वाचा हा पूल आहे. सातारा, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमधून सातारा शहरातील दळणवळणासाठी खुशकीचा मार्ग म्हणून सातारा लोणंद मार्गाचा वापर केला जातो. नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ राहते. तसेच पुणे-मुंबईसह परराज्यातील मालवाहतूकही याच मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे या परिसरातील सातारा शहरात दळणवळण असलेल्या 36 गावांना नेहमीच गैरसोयीला सामोरे जावे लागते.
मागील काही वर्षांपासून वाढे पुलावर दोन्ही बाजूंकडून येणार्या पाण्यामुळे तळे साठते. हे पाणी काढून देण्यासाठी वारंवार मोर्या खुल्या केल्या जात असल्या तरी पाण्याबरोबर येणार्या मातीमुळे त्या पुन्हा बंद होतात. पावसाळ्यात या पुलावरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अगदी अर्ध्या-अर्ध्या फुटावर खोल-खोल खड्डे असल्याने जाळेच तयार झाले आहेत तर वारंवार होणार्या वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाढेपुलावरील खड्डे संबंधित प्रशासनाने त्वरित मुजवावेत. यापूर्वीही या रस्त्याची मलमपट्टी करताना दर्जाहीन डांबरीकरण केले जात असल्याने वारंवार खड्डे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर खड्डे मुजवताना किंवा पॅचवर्क करताना कामाचा दर्जाही सुधारावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.