सातारा जिल्ह्याचा जलसाठा झाला तब्बल 102.08 TMC घनफूट

0
510
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेली तीन महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील धरण आणि तलावामध्ये चांगला पाणीसाठा जमा झाला आहे. सातारा जिल्ह्याचा जलसाठा तब्बल १०२.०८ टीएमसी (६४.८२ टक्के) झाला आहे. कोयना, धोम, धोम- बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या सहा मोठ्या आणि १० मध्यम धरणांचा जलसाठा एकूण १५७.४८ टीएमसी (अब्ज घनफूट) असून, सध्या यातील मोठ्या धरणात ९६.८९ टीएमसी आणि मध्यम धरणात ५.१९ टीएमसी असा एकूण १०२.०८ टीएमसी (६४.८२ टक्के) जलसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, मोरणा, हातगेघर, उत्तरमांड, वांग- मराठवाडी हे प्रकल्प भरून वाहिले असून कोयना, कण्हेर, उरमोडी धरणातून पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी जलविसर्ग सुरू आहे. गेल्या दीड- पावणेदोन महिन्यातील वळीव आणि त्यानंतरच्या मोसमी पावसाने जलाशयात तुलनेत उच्चांकी जलसाठा झाला आहे.

पश्चिम घाटातील धरणक्षेत्रासह डोंगरमाथ्यांवर जोरदार तर, अन्यत्र पावसाची रिपरिप कायम आहे. सलग जोरदार पावसाने कोयना शिवसागरात दिवसागणिक अडीच ते पावणेतीन टीएमसी पाण्याची आवक सुरू असून, जलसाठा ६७.२० टीएमसी (६३.८५ टक्के) झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो तिपटीहून अधिक आहे. गतवर्षी हाच जलसाठा २६.४७ टीएमसी (२५.१४ टक्के) राहिला होता.

कोयना शिवसागरात २५,७७६ घनफूट (क्युसेक) पाण्याची आवक सुरू असून, आज रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटक्षेत्रात १४.६६ मिमी, तर एकूण १८७७.३३ मिमी (वार्षिक सरासरीच्या ३७.५४ टक्के) पाऊस झाला आहे. गतवर्षी आजमितीचा हाच पाऊस ११२ मिमी, तर एकूण १२७५ मिमी (वार्षिक सरासरीच्या २५.५० टक्के) झाला होता. तर, कोयनेचा धरणसाठा २६ टीएमसी (२५ टक्के) राहिला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत एकंदरच पाऊसमान आणि जलसाठ्यांची स्थिती अतिशय भक्कम राहिली आहे. मात्र, अतिपावासाने खरिपाच्या पेरण्यांना संकटात टाकले आहे.