सातारा प्रतिनिधी | थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी प्रमाणे कास पठारावर देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. कारण या ठिकाणी विविध अशा रंगातील फुलांना बहर येतो आणि येथील कास तलावामुळे येथील वातावरण सर्वांना आकर्षित करते. कास, बामणोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोसळत असणार्या संततधार पावसामुळे या संपूर्ण परिसरातील पावसाळी पर्यटन बहरले आहे. पर्यटक या परिसरात फिरायला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत. सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव काही दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरला असून त्याच्या सांडव्यावरून वाहणार्या पाण्यामुळे कासच्या सांडव्याला भुशी डॅमचा फिल आला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
काही अती उत्साही पर्यटक आपल्या आपल्या लहान मुलांना सांडव्याच्या पाण्याच्या मधोमध जाऊन फोटो काढण्याचा मोह करत आहेत. मात्र, सांडव्यावरून येणारे पाणी अचानक वाढल्यास त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कास सांडव्यानजिक पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच काससह भांबवली वजराई धबधबा, एकीव धबधबा, मुनावळे येथील केदारेश्वर धबधबा यासह बामणोली, शेंबडी, मुनावळे या बोटिंगच्या ठिकाणी देखील पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत.
सातारा शहराच्या पश्चिमेला असणार्या जागतिक वारसा स्थळ कासपर्यंतचा संपूर्ण परिसर हा पूर्णपणे हिरवागार झाला असून निसर्गामध्ये पर्यटनासाठी सातारा शहरातून व इतर ठिकाणाहून येणार्या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागला आहे. आर्थिक उलाढाल देखील वाढली आहे. काससह परिसरामध्ये पर्यटनासाठी सातारा शहरातून तसेच पुणे, मुंबई येथून येणार्या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाने या परिसरामध्ये चांगला जोर दिल्याने या संपूर्ण परिसरातील पावसाळी पर्यटन बहारले आहे.