कराड प्रतिनिधी | कराड येथील विमानतळ विस्तारवाढसंदर्भात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी कृती समितीचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी देखील उपस्थिती लावली. या बैठकीत कराड येथील विमानतळ विस्तारीकरणाला विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा विरोध कायम आहे. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची संयुक्त मोजणी केलेली नाही. त्यामुळे ज्या बाधितांना प्रशासनाने मोबदल्याचे वितरण केले आहे, ते बेकायदेशीर असल्याची तक्रार डॉ. पाटणकर यांनी केली.
कराड येथे पार पडलेल्या बैठकीस कृती समितीचे विनायक शिंदे, प्रमोद पाटील, हरिश्चंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रामभाऊ पाटील आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, ‘खरे तर कोणताही नवीन प्रकल्प करताना पुनर्वसनाचे जे नियम घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. मात्र, त्या नियमांची पायमल्ली कराड येथे झाली आहे. त्यामुळे येथील भूसंपादन हे बेकायदेशीर ठरते.
परिणामी, या पुढच्या काळातही विस्तारी करणाला आमचा विरोध कायम ठेवणार आहोत. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी विस्तारवाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांचे मत जाणून घेतले. ते पुढील प्रशासनाला कळविण्यात येईल, असे सदस्यांना त्यांनी सांगितले.