सातारा प्रतिनिधी | पुसेगावसह जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, चोर्या, घरफोड्यांसारखे 20 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे करुन गेल्या आठ वर्षांपासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगाराला चिंचणी ते वाठार रस्त्यावर भाडळे घाटात धडक कारवाई करीत पुसेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
कोहिनूर झाकीर काळे ( रा. मोळ, ता. खटाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोहिनूर काळे हा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हे करुन पसार झाला होता. सदर आरोपीचा शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता. सपोनि संदीप पोमण काळे याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. भाडळे घाटात पेट्रोलिंगदरम्यान पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद केले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे पुसेगाव परिसरासह जिल्ह्यातील घरफोडी, चोर्या, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सदीप पोमण, फौजदार सुधाकर भोसले, दीपक बर्गे, प्रमोद कदम, योगेश बागल, दादासाहेब देवकुळे, पो. कॉ. दर्याबा नरळे, अविनाश घाडगे, अक्षय जायकर, शुभम पवार यांनी ही कारवाई केली.