कराड प्रतिनिधी | प्रवाशाच्या सेवेसाठी असणारी सर्वाची लाडकी एसटी बस गेली ३५ वर्षे गावात फिरकली नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना कधी पायी तर कधी खासगी वाहनांनी प्रवास कारवाया लागत होता. मात्र, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि युवकांच्या पाठपुराव्यामुळे कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक व शेणोली या गावांजवळील गोंदी गावात एसटी बस सुरु झाली आहे. सुवासिक इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी बस आल्याने तिचे विद्यार्थी, ग्रामस्थांच्या वतीने उत्सहात स्वागत करण्यात आले.
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात गोंदी हे गाव आहे. साधारणतः १५ किलोमीटर अंतरावर असल्या या गोंदी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी कराडला नियमितपणे प्रवास करतात. त्यांना कराड व इतर ठिकाणी जाण्यासाठी शेणोली स्टेशन व रेठरे बुद्रुक येथून जाणाऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. शेणोली ते कृष्णा कारखाना मार्ग व रेठरे बुद्रुकपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावात येण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे गावातीळ बहुतांश नागरिक खासगी वाहनाचा वापर करतात.
कराड येथून ये- जा करण्यासाठी गावातून रेठरे बुद्रुक व शेणोली – कारखाना रस्त्यापर्यंत अडीच किलोमीटर पायपीट करावी लागते. कराड व इतरत्र जाण्यासाठी वाहतुकीची सुलभ सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपासून कराड एसटी आगाराकडे प्रयत्न सुरू केले. यासाठी गावातील युवकांनी महामंडळातील संपर्कातून पाठपुरावा केला. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले व गावात कराड आगाराची एसटी येऊ लागली आहे. कराड आगारातून सुटणारी एसटी कार्वे, दुशेरे, शेरेमार्गे गोंदीमध्ये येऊ लागली आहे. सध्या सकाळी व सायंकाळच्या वेळेत तीन फेऱ्या सुरू झाल्या असल्यामुळे गावाची तालुक्याच्या ठिकाणी रहदारी वाढली आहे.