सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे पोलिसांच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडून एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिवडी ते फलटण रस्त्यावरील एच.पी. पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन निघालेला ट्रक दहिवडी पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये 5 लाख 40 हजार रुपये किमतीचे 18 मोठे रेडे व म्हैस ही जनावरे आढळून आली.
या जनावरांची विनापरवाना वाहतूक करुन ती कत्तलीसाठी नेण्यात येत होती. त्यामुळे ही जनावरे व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकचा चालक जमीर आब्बास सवार (वय 43 वर्षे) तसेच राज आसिफ पटेल (दोघेही रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार बी. एस. खांडेकर करत आहेत.